सावनेर : निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . या अनुषंगाने सावनेर तालुक्यात एकूण ११२ सदस्यांचे सख्याबळ असलेल्या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . यावर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे . बारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ११२ सदस्यांचे भाग्य एकूण ४ ९ हजार ५०७ मतदार ठरविणार आहेत . बुधवारपासून ( ता .२३ ) ऑनलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून सोमवारपर्यंत २१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले . ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यातील क्रीडा विकास , पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार , यांच्या मतदारसंघात होत असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची समजल्या जात आहे . सावनेर तालुक्यातील गडमी , जयपुर , टेभुर्डोह , जटामखोरा , नरसाळा खापा , पाटणसावंगी , खुबाळा , खुरसापार , पोटा , सावंगी -हेटी , सोनपूर , नांदुरी या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , जिल्हा परिषद सदस्या छाया बनसिंगे , प्रकाश खापरे , चंद्रशेखर बनसिंगे , गोविंदा ठाकरे , विष्णू कोकड्डे , यादव ठाकरे आधी पदाधिकारी मतदात्यांशी जनसंपर्क वाढवित आहेत , तर भाजपच्या वतीने विजय देशमुख , नितीन राठी , सोनबा मुसळे प्रयत्नशील आहेत . ४ जानेवारी २०२१ रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या तारखेनंतर मात्र निवडणुकीचा राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याची चर्चा आहे.
समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल
२३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरायला सुरुवात झाली असून रविवारपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही . सोमवारी मात्र ग्रामपंचायत सदस्य पदासाठी २१ नामनिर्देशन पत्र आपल्याला समर्थकांसह दाखल करण्यात आले . खुबाळा येथील ९ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या ग्रा.पं.सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , पं.स.सभापती अरुणा शिंदे , चंद्रशेखर बनसिंगे , पं.स.सदस्य गोविंदा ठाकरे , यादव ठाकरे , खुशाल खुबाळकर योगेश पाटील , गणेश्वर गजभिये आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते