अनाथांची माय हरपली : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महा.दर्पण चे संपादक विजय पांडे व माई शी भेटीचे छायाचित्र

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

   सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास

मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधूताई सपकाळ या ‘अनाथांच्या आई’ झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा… पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे.

वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधूताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधूताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या कधी रेल्वेत राहिल्या, तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. भुकेलाच त्या आपली प्रेरणा मानत होत्या. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि नंतर तो चांगलाच फुलला.

दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, इचलकरंजीचा प्रतिष्ठित ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ इ. उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना ‘आनंदमयी पुरस्कार’ही मिळाला आहे. पंजाबमधील लुधियानाच्या ‘सत्पाल मित्तल नॅशनल अॅवॉर्ड’च्याही त्या मानकरी आहेत. या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि सन्मानचिन्हे देऊन समाजातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.

आज दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मांजरी येथे संस्थेत अंत्यदर्शनासाठी आदरणीय माईचे पार्थिव ठेवण्यात येईल. दुपारी 12 वाजता ठोसर पागा स्मशानभूमी नावीपेठ पुणे येथे अंत्य संस्कार करण्यात येईल.

  महाराष्ट्र दर्पण न्युज पोर्टल  संपादक मंडळ , प्रतिनिधी तसेच सर्व वाचकांना तर्फे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले

Wed Jan 5 , 2022
आरोग्य कर्मचा-यास मारहाण व शिवीगाळ केल्या च्या निषेधार्थ १ दिवस कामबंद आंदोलन केले #) नरखेड तालुक्यातील खंडाळा ला आरोग्य कर्मचा-याशी अपनास्पद वर्तणुकीच्या निषेधार्थ. कन्हान : – कोविड लसीकरणात नरखेड तालुक्यातील खंडाळा गावच्या सरपंचाने आरोग्य कर्मचा-यास शिवीगाळ करून मारहाण करित भ्रमणध्वनी वरून आरोग्य अधिका-यास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ नागपुर जिल्हा आरोग्य कर्मचा-यांनी […]

You May Like

Archives

Categories

Meta