
सावनरे, ता . ५ : येथून दोन किलोमीटर अतंरावरील रायबासा येथे शनिवारी ( ता .५ ) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात शेतात वीज पडल्याने एक महिलेचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या . मिळालेल्या माहितीनुसार रायबासा येथील जंगलू मरस्कोल्हे यांच्या शेतात खरीप हंगामातील शेतीची कामे सुरु आहेत . तेथे काम करीत असलेल्या महिला कामगारांवर अचानक काळाने झडप घातली . सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली . काम करीत असलेल्या अंजना जंगलू मरस्कोल्हे ( वय ७० , रायबासा ) या महिलेच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला . याच शेतात काम करणाऱ्या गीता सुनील कुभरे ( वय ४० ) व मंजू दौलत मरकाम ( वय ४५ , रायबासा ) या गंभीर जखमी झाल्या . घटनेची माहिती मिळताच येथील सरपंच सोनू राव यांनी दोन्ही गंभीर जखमी महिलांना लगेच सावनेर येथील सरकारी दवाखाण्यात दाखल केले . या दोन्ही महिलांचा वेळेवर उपचार झाल्याने त्या धोक्याबाहेर असल्याचे सरपंच सोनू राव यांनी सांगीतले , घटनेचा पुढील तपास केळवद पोलिस करीत आहेत .